हिंदी सक्ती आणि त्याला झालेला तीव्र विरोध, यामुळे मराठी शाळा आणि भाषा हा मुद्दा पुन्हा पुन्हा प्रकाशझोतात येतो. त्यापाठोपाठ प्रांतीय अस्मिता की राष्ट्रीय एकता, मराठीचा ऱ्हास की इंग्लिशचं फॅड, मातीशी नाळ का फॉरेनची नोकरी असे अनेक पैलू समोर येतात. पण यापैकी वरवरचे 'कॉस्मेटिक' प्रश्न कोणते आणि खोलवरचे 'सिस्टेमिक' प्रश्न कोणते?
“ओ अंकल, काढा की त्या इंग्लिश-हिंदीतल्या पाट्या आता तरी,” साधारण पंचविशी-तिशीतला एक तरुण आपल्या हातातला मोबाइल नाचवत दुकानदाराला म्हणाला. डायरीत हिशोब मांडत बसलेल्या अंकलनी डोकं वर करून त्याच्याकडे हसून बघितलं. परिचय इतका नित्याचा की ना त्याने सांगितलं की तो काय घ्यायला आला आहे, ना अंकलनी विचारलं. आधीच बांधून ठेवलेली एक पिशवी काउंटर वर सरकवत ते म्हणाले, “तेइस बरस झाले आमाला हिथं. समद मराठी बोलते मी.”
“हो पण उद्या आमची पोर आली लाठ्या-काठ्या घेऊन, तर ते पाटीच बघतील ना! त्यांना काय माहिती की तू मराठी बोलते, की तुझा बायको मराठी बोलतो.” तोही त्यांची हलकी टिंगल करत म्हणाला.
“दीदी आली वाटत लंडनवरून. टॅक्सी दिसली सकाली सकाली साडेचारला.” आंटीने नवीनच घेतलेला गॉगल पुसता पुसता त्याला विचारलं. ‘परप्रांतातून’ आलेल्या, डोक्यावरून गुडघ्यापर्यंत घुंगट घेतलेल्या ह्या आंटींना त्यानं पहिल्यांदा बघितलं तेव्हा दुसरीत असेल तो. आपल्या प्रत्येक इयत्तेसोबत त्यांचा घुंगटही कसा हळूहळू वर गेला हे त्याला चटकन आठवलं. आपल्या महाराष्ट्राचा पुरोगामीपणा यांनाही मानवला वाटतं, असा विचार त्याच्या डोक्यात तरंगून गेला.
हे सगळं चालू असतानाच, संपूर्ण चेहऱ्याभोवती स्कार्फ गुंडाळलेली एक तरुणी, आपली स्कुटी घाईघाईने लावून, त्याच्या शेजारच्या काउंटरवर येऊन उभी राहिली. “एक पॅकेट दूध आहे?” तिने त्याच घाईत विचारलं. अंकलने फ्रिजमधून दूध काढून तिच्यासमोर ठेवलं.
“त्रेचालीस” - दुकानदार.
बारकोड स्कॅन करत असतानाच तिने काहीसं ओशाळून दुकानदाराकडे बघितलं, “फोर्टीथ्री का थरट्रीथ्री?”. अंकलनी बाजूला उभ्या असलेल्या त्या मुलाकडे पुन्हा एकदा हसून नजर टाकली. अटकेपार पाट्या टाकायला निघालेल्या त्याचं पानिपत गल्लीवरच्या किराणा दुकानातच होईल, असं त्याला कधी वाटलंच नव्हतं.
गल्लीतल्या दुकानापासून दिल्लीतल्या टीव्हीवर, सगळीकडे मराठी शाळेचा आणि भाषेचा वाद सुरु होता. कधी हिंदी विरुद्ध मराठी, तर कधी मराठी विरुद्ध इंग्रजी. शाळेत असताना कधी मराठीच्या पुस्तकाला हिंदीच्या पुस्तकाची भीती वाटत नव्हती, ना इंग्रजीच्या टेस्टला मराठीच्या गृहपाठाची. पण सध्याच्या या भाषाभाषांच्या लढाईत, विद्यार्थी विरुद्ध शिक्षण या चिरंतन युद्धाचा विसर पाडतोय का? हा प्रश्न पडायला लागला. मराठी, हिंदी आणि इंग्रजी हा त्रिकोणी संघर्ष केवळ पाट्यांपुरता नाही, तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणालाही आकार देतो. मग खरंच शिक्षणाची भाषा ठरवताना आपण काय कमावतो आणि काय गमावतो, यावर आम्हा मित्रांनी आपल्या अनुभवांची देवाणघेवाण केली. मराठी शाळांत वाढलेल्या आणि आता जगभर वेगवेगळ्या क्षेत्रांत योगदान देणाऱ्या आम्हा IISER पुण्याच्या काही माजी विद्यार्थ्यांचे हे निवडक विचार.
परभणीचा मृणाल कोरवार म्हणाला, “माझं प्राथमिक शिक्षण मराठीतून, तर माध्यमिक सेमी-इंग्लिश मधून झालं. सेमी-इंग्लिश असूनही शाळेत क्वचितच इंग्रजीमध्ये शिकवलं किंवा बोललं जायचं. इंग्रजीतून बोलायचं तर सोडाचं, पण साधी वाचण्याचीही सवय नव्हती. फक्तं गणित आणि विज्ञानापुरतंच इंग्रजी वापरायचो. त्यामुळे इंग्रजीबद्दल आत्मविश्वास कधीच तयार झाला नाही. कॉलेजला गेल्यावर, आणि विशेषतः, भारताबाहेर इंग्रजी वातावरणात वावर सुरू झाल्यावर कळलं की आपण बरंच काही गमावलं आहे. संवादकौशल्य वाढवण्यासाठी काही जास्तीचे कोर्सेस करावे लागले. अजूनही कधी कधी वाटतं की इंग्रजीत मोकळेपणाने व्यक्त होता आलं असतं, तर काही वेगळं झालं असतं. नशीब एवढंच की उच्च शिक्षण सायन्स आणि टेक्नोलॉजी क्षेत्रात होतं, म्हणून भाषेचा फारसा अडथळा आला नाही. पण सामाजिक किंवा व्यावसायिक पातळीवर थोडं मागे राहिल्याचं जाणवतं. आता भारताबाहेर राहून आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करताना लक्षात येतं, की फक्त इंग्रजी लिहिणं-बोलणं पुरेसं नाही तर ते कॉन्फिडंसने वापरता येणं गरजेचं आहे. जर लहानपणी अशा संधी मिळाल्या असत्या, तर सुरुवातीपासूनच स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करता आलं असतं. मराठी आणि सेमी-इंग्लिश शिक्षणाने मला नक्कीच चांगला पाया दिला, पण माझ्या मते शाळेत इंग्रजी लिहिण्या-वाचण्याइतकंच संवादकौशल्यालाही महत्त्व दिलं, तर पुढील विद्यार्थ्यांना जास्त फायदेशीर ठरेल.”
“Distillation, equilibrium, thermodynamics” जणू गालावर चपराक मारावे तसे हे शब्द कानावर पडले. दहावीपर्यंत मराठीतून शिक्षण घेतलेला साताऱ्याचा ज्ञानेश डुबल त्याची इंगजीतून शिकण्याची पहिली वेळ आठवताना म्हणाला, “ अकरावी ते बी. एस् सी. च्या काळात माझा वेळ सायन्स शिकण्यापेक्षा भाषांतर करण्यातच जास्त गेला. आता वाटतं की शाळेतच सेमी-इंग्लिश घेतलं असतं, तर अचानक पडलेलं इंग्रजीच दडपण वाटलं नसतं. बी. एस् सी. नंतर IISER पुणे च्या इंटिग्रेटेड पी. एच. डी. साठी माझी मुलाखत होती. मला इंग्रजीतून विचारलेले प्रश्न समजत तर होते, उत्तरंही येत होती, पण इंग्रजीतून देता येत नव्हती. सुदैवाने, पॅनलच्या हे लक्षात आले आणि त्यांनी मी दिलेली हिंदी-मराठी मिश्र उत्तरं मान्य केली. ही सवलत दिली नसती तर माझं पीएच. डी. साठी सेलेक्शन झालं नसतं आणि माझा पुढचा केम्ब्रिज विद्यापीठ व त्यानंतर सौदी अरेबियातील KAUST विद्यापीठात वैज्ञानिक म्हणून झालेला हा प्रवास घडलाच नसता.” पीएच. डी. च्या काळातला एक किस्सा आठवताना तो म्हणतो, “माझ्या संशोधनाबद्दल इंग्रजीतून प्रेसेंटेशन द्यायची वेळ आली त्यावेळी केवळ इंग्रजीतून बोलण्याच्या भीतीमुळे मला हे सगळं सोडून पळून जावं वाटलं. पण मित्रांनी वेळेत मदत केली आणि मी कसंबसं मोडकं-तोडकं प्रेसेंटेशन दिलं. तेंव्हा मला प्रकर्षाने जाणवलं की मला शाळेपासून इंग्रजीची सवय असली असती, निदान STEM (Science, Technology, Engineering, Mathematics) विषयांपुरती तरी, तर ही वेळ आलीच नसती. लवकरचं पालकत्वं येणार असल्याने, मुलांच्या शिक्षणावर आणि सध्याच्या शिक्षणव्यवस्थेवर विचार करताना मला वाटते की संपूर्ण मराठी पेक्षा सेमी-इंग्रजीतून दिलेले शिक्षण जास्त महत्वाचे आहे. विशेषतः जेंव्हा जग अधिकाधिक जवळ येत आहे आणि नवीन पिढीसाठी राज्य, प्रांत, आणि देश या सीमा हळूहळू पुसट होत चालल्या आहेत.”
कॅलिफोर्नियातल्या UCLA विद्यापीठात संशोधक असणारा स्वप्नील वऱ्हाडे म्हणतो, “मी हायस्कूलचं शिक्षण दोन वेगवेगळ्या शाळांमधून घेतलं. सातवीपर्यंत सर्व विषय इंग्रजीत होते, पण आठवी ते दहावी सेमी-इंग्लिश. दोन्ही भाषांचं मिक्स अनुभवायला मिळालं. विज्ञान आणि गणिताची पुस्तकं इंग्रजीत होती, पण शिकवणं, चर्चा करणं, समजावून सांगणं हे सगळं मराठीतूनच. त्यामुळे विचार करण्याची सवय मराठीतच लागली. इंग्रजीशी लवकर झालेली ओळख कॉलेज, स्पर्धा परीक्षा आणि परदेशात काम करताना उपयोगी आली. इंग्रजी येत नव्हतं फारसं, पण ती भाषा कधीच परकी वाटली नाही. शाळेतली ती सवय नंतर ईमेल, रिपोर्ट्स आणि व्यावसायिक संवादात खूप मदतीची ठरली. त्याचबरोबर मराठीत शिकल्यामुळे भाषेशी असलेली ओळख आणि भावनिक स्पष्टता टिकून राहिली. स्वतःला व्यक्त करणं, युक्तिवाद करणं, गोष्टी समजावून सांगणं—हे सगळं मराठीत अधिक नैसर्गिक वाटायचं. आजही हे मला माझ्या मूळ स्वभावाशी जोडून ठेवतं, विशेषतः इतकी वर्ष परदेशात राहूनसुद्धा. तरीही काही अडचणी होत्याच. शिक्षकांची इंग्रजीवरची पकड मर्यादित होती, त्यामुळे पाठांतरावर भर पडायचा. न समजून घेता घोकंपट्टी करण्याची ही सवय मोडायला बराच काळ जावा लागला. ‘इंग्रजी म्हणजे यश’ हा संदेश नकळत खोलवर रुजला होता. आज वाटतं, जर काही बदल करता आला असता, तर शिक्षकांना समजून शिकवण्याचं प्रशिक्षण दिलं असतं. विद्यार्थ्यांना विविध भाषा सहजपणे हाताळयता याव्यात यासाठी पोषक वातावरण दिलं असतं. भाषा साधन असावं, अडथळा नाही. यूरोपमध्ये बहुभाषिकता ही संपत्ती मानली जाते. कोणत्याही एका भाषेच्या चाकोरीत न अडकता शिक्षणपद्धती सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करते. आपल्याकडेही इतकी भाषीय विविधता असून, आज या गोष्टीची कमी जाणवते.”
महाराष्ट्रभर भ्रमंतीकरत वाढलेल्ला सौरभ कदम, त्याच्या वेगवेगळ्या शाळांमधील अनुभव सांगताना म्हणाला. “माझं स्वतःच सातवी पर्यंतच शिक्षण संपूर्ण मराठीतून झालं. तिथून दहावी पर्यंत सेमी-इंग्लिश. त्यानंतर मराठी पाठ्यपुस्तक कधीच हातात नाही घेतलं. आता मागे वळून या एज्युकेशन सिस्टिमचा एक मोठा फायदा दिसत आहे. ज्या वयात विषयांचे आकलन होणे जास्त महत्वाचे होते, त्या वयात मातृभाषेत शिक्षण घेतल्याने ज्ञानार्जन सहज झाले. नंतर जेंव्हा गणित आणि विज्ञान या विषयात खोलात जाण्याची गरज पडली, तेंव्हा इंग्रजीतुन उपलब्ध असलेला ज्ञानाचा प्रचंड मोठा साठा सेमी-इंग्लिशमुळे वापरता आला. ग्रॅज्युएशनच्या काळातही इंग्रजीतून शिकताना अडचण नाही आली. मागची कित्येक वर्ष अमेरिकेत राहतोय. इथले पीएच. डीचे दिवस आणि सध्याची संशोधकाची नोकरी, या दरम्यान दैनंदिन वापरातील मराठीशी संपर्क तुटत गेला. फोनवर घरच्यांना आणि मित्रांना बोलतो तेवढीच मराठी. पण तरीही मराठी परकी नाही झाली. तिच्याशी असलेलं नातं फक्त चित्रपट, गाणी यामार्फतच नाही तर जी. ए., व. पु., खांडेकर, नेमाडे यांच्यामार्फत अजून घट्ट झाले. हे वाचतानाच आपल्या एज्युकेशन सिस्टिमची एक खंत मात्र जाणवली – अभ्यासक्रमातुन मराठी हा फक्त विषय म्हणून शिकवला गेला, पण मराठी साहित्य वाचायला लावण्याचा प्रयत्न कधी नाही झाला. परदेशात एखादी भाषा शिकताना त्या भाषेतील क्लासिक्स वाचणे हा शिक्षणाचा अविभाज्य भाग मानला जातो. आम्हाला शाळेत शिकवताना मराठी क्लासिकातले फक्त धडेच पुस्तकात होते. अभ्यासक्रम म्हणून एखादी कादंबरी, नाटक किंवा काव्यसंग्रह कधीच पूर्ण वाचायला लावला नाही. मराठी भाषासक्तीवर चर्चा करताना कोणी या मुद्यावर फार बोलताना दिसत नाही. शिक्षणाची भाषा जरी संपूर्ण मराठी केली पण मराठीची गोडी निर्माण करणारा अभ्यासक्रम नसला, तर ते गळत्या चड्डीला हाताने पकडून चालण्यासारखे होईल. काम भागेल पण समस्या नाही सुटणार.”
कॅनडात गणितज्ञ म्हणून काम करणारा उपेंद्र कापशीकर म्हणतो, “प्राथमिक शिक्षणात स्थानिक भाषांचा सहभाग वाढायला हवा या बाबतीत माझ्या मनात अजिबातच शंका नाही. मी साधारण दहावीपर्यंतचं गणित मराठीतूनच शिकलो. शाळेच्या पहिल्या दिवशी जर कोणी मला इंग्लिश मध्ये पाढे शिकवले असते तर मी कदाचित त्याच दिवशी गणित सोडून दिल असतं. अर्थात, गणित आवडलं नसतं तरी काही सगळं जग संपलं असतं अशातला काही भाग नाही. इंग्लिश मिडीम मधून शिकलो असतो, तर नाही म्हणायला काही क्षुल्लक असे फायदे झालेही असते. पण माझ्या हातात असेल तर मी प्रत्येक जन्मात मराठीतूनच शिकेन. कारण अगदी सोप्पंय–ज्ञानोबा कानावर पडलं की माझ्या तोंडांतून आपसूकच माउली बाहेर पडतं. आणि देव तोच असला, तरी "ग्यानेश्वर" काही परका वाटल्याशिवाय राहत नाही. पण आता शिक्षण, भाषा आणि संस्कृती या विषयाला इतके कंगोरे आहेत की त्यांची गुणवत्ता फक्त शाळांमध्ये कोणत्या भाषा शिकवता यावरून ठरावावं हे मला थोडं बाळबोध वाटतं. मध्यम वर्गातली आज किती जण मराठी शाळांमध्ये जातात? एकीकडे मराठी शाळांमध्ये हिंदीचा शिरकाव होऊ नये म्हणून ठाम उभे राहणारे आपण, जर बहुतांश विद्यार्थी CBSE आणि ICSE मध्येच जाणार असतील तर त्यांच्यातल ‘मराठीपण’ टिकवण्यासाठी काय करत आहोत, याचं उत्तर मला दिसत नाही. शाळेच्या भाषेच्या पलीकडे जाऊनही आपलं काहीतरी चुकतंय असं वाटत राहतं. आठ-दहा वर्षांची मुलं खेळत असताना त्यांच्या आजूबाजूला सहज फेरफटका मारायला गेलात, तर त्यांची "vocabulary" किती शाळेतून घडली आणि किती YouTube वर, हे कळायला फारसा वेळ लागणार नाही. शाळांमध्ये किती भाषा शिकवल्या जातात यापेक्षा त्या कशा शिकवल्या जातात, याकडे लक्ष द्यायची आज गरज आहे. कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकवली जाणारी दुय्यम दर्जाची मराठी आणि मराठी शाळांमध्ये औषधापुरती शिकवली जाणारी इंग्रजी, यातून आपण कधी पुढे जाणार? भाषाभाषांच्या भांडणाचा हा डोंगराएवढा प्रश्न आहे. त्यावर ठोसं असं उत्तर नसेल माझ्याकडे; तरीही ज्ञानेश्वर-ग्यानेश्वरच्या या लढाईत आपल्याला पसायदान शिकवायचा विसर पडायला नको, ही राई इतकी अपेक्षा मात्र नक्की आहे.”